Thursday, December 31, 2020

नवीन वर्ष


 सरत्या नवीन वर्षाने कानामध्ये हळूच गुंजन करावे.

नव्या वर्षातील आनंदाचे दान अलगद हाती द्यावे.

ओठी यावे हासू सदैव अन्

अंगणात चैतन्याचे चांदणे पडावे.

नव्या वर्षातील प्रत्येक क्षणी ने

तुमच्या चेहऱ्यावर हासू यावे.

                 आराधना

Wednesday, December 30, 2020

नवा सूर्य


 नवा सूर्य, नवी दिशा.

कर्तुत्वाने तुझ्या

उजळू दे दाही दिशा.

क्षितिजा पलिकडे मार मजल.

अन् नजरेत सदा असू दे,

यशस्वी होण्याची आशा.

            आराधना


Tuesday, December 29, 2020

गाभारा


 मनातील विचारांचा गाभारा,

कधीतरी बंद करावा.

आपल्या भावनांचा कधीतरी,

स्वतःच्या मनालाच अभिषेक करावा.

              आराधना

Monday, December 28, 2020

सुंदरता


 सुंदरतेचा प्रवास हा मनापासून सुरू होतो

आणि कर्तुत्वाजवळ येऊन थांबतो.

 ज्याचं मन सुंदर तो सुंदर.

ज्याचं कर्तृत्व सुंदर तो सुंदर.

मनाची सुंदरता आणि कर्तृत्व तुम्हाला सौंदर्याच्या स्पर्धेत

अव्वल बनवते.

म्हणून बाह्य साैंदर्य नटवण्यापेक्षा मनाची सुंदरता

वाढवा आणि सगळ्यांचे हवे हवेसे बना.

             आराधना

Sunday, December 27, 2020

स्वप्न


 स्वप्नांचा बाजार नको.

स्वप्नांची उधारी नको.

तुम्हाला जे हवं ते

मनाच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करा.

तेव्हा कुठे स्वप्नपूर्तीचा

अखंड वाहतो झरा.

          आराधना

Saturday, December 26, 2020

सुंदरता


 सुंदर फुलांनी बनलेला हार

सगळ्यांनाच भावतो.

पण हा हार बनवण्यासाठी फुलांनी

हृदयातून आरपार टोचून घेतलेली सुई

अन् ओवून घेतलेला धागा,

कुणालाच ना दिसतो.

           आराधना

Friday, December 25, 2020

विचार


 वय वाढेल तसं 

प्रगल्भता वाढत गेली की,

विचार परिपक्व बनतात,

अन् हे परिपक्व विचारच तुम्हाला

यशाच्या शिखरावर नेऊन बसवतात.

                 आराधना

Thursday, December 24, 2020

आनंद


 वाटतं राहायचा आनंद,

खुळवायचं हसू.

आपल्यामुळे कुणाच्याही डोळ्यात,

येऊ नयेत आसू.

               आराधना

Wednesday, December 23, 2020

नातं


 एक शब्द पुरेसा असतो,

नवीन नातं जोडायला.

एक शब्द पुरेसा असतो,

असलेलं जीवाभावाचं नातं तोडायला.

तोडायच का जोडायच  ,

ज्याचं त्याने ठरवायचं.

प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं.

त्याला जसं हवं, तसचं त्याला जगू द्यायचं.

                        आराधना

Tuesday, December 22, 2020

पाऊलखुणा


 यशाच्या पाऊलखुणा

उमटवायच्या असतील तर

स्वतः ला आत्मटीकेच्या हातोडीने

ठोकावं.

काय चागलं? काय वाईट?

काय चुकतं माझं?

जरा स्वतः लाच विचारून पहावं.

                आराधना

Monday, December 21, 2020

विचार


 चांगले विचार आणि चांगली माणसं,

पूंजी आहे आयुष्याची.

त्यांच्या साथीनेच उंचावते,

कमान तुमच्या यशाची

Sunday, December 20, 2020

मार्ग


 आयुष्याच्या प्रवासात खूप माणस भेटतात.

काही साथ देतात तर काही साथ सोडतात.

कोण,कुठे,कसा बदलला याचा विचार का करायचा?

सोडून गेलेला प्रत्येक माणूस काय शिकवून गेला

हा विचार करून मार्ग आपला चालायचा.

आराधना

Saturday, December 19, 2020

वेदना


 वेदनेच्या गाभाऱ्यावर,

नित्य दुःखाचा अभिषेक.

तूच सांग माझ्या जीवा,

मग व्यर्थ करिशी का शोक?

     आराधना

Friday, December 18, 2020

नदी


 माणसानं कसं नदीसारखं असावं.

चांगलं वाईट, राग लोभ काही न धरता,

येईल त्याला सोबत घेऊन,

पुढे जात राहावं.

          आराधना

Thursday, December 17, 2020

दिवा


 सभोवताली काळोख असला तरी,

कुठंतरी एक दिवा मिणमिणत असतो.

मिणमिणत्या प्रकाशात त्याच्या,

मार्ग तुम्हाला दावित असतो.

           आराधना

Wednesday, December 16, 2020

सुख


 प्रयत्न तर रोजच चालू असतो.

प्रत्येक गोष्टीत जिंकण्याचा.

दुसऱ्याच्या सुखासाठी एक दिवस,

आनंद घेऊ या हरण्याचा.

               आराधना

Monday, December 14, 2020

सुख


झटत राहा दुसऱ्याच्या सुखासाठी,

दिवस अन् रात्र.

सुख समाधानाच्या फुलांनी भरेल,

तुमच्या आयुष्याचं पात्र.

             आराधना

किनार

 आनंदाच्या क्षणांना

दुःखाची हळवी किनार असते.


मनात आत दूर कुठेतरी,

हळूवार ती सलत असते.

     आराधना

Sunday, December 13, 2020

सहजीवन


 सोबत दिसण्यापेक्षा,

सोबत असणं महत्त्वाचं आहे.

दिसण्या आणि असण्याच्या फरकातच,

सहजीवनाचं गोड गुपित आहे.

                    आराधना

Saturday, December 12, 2020

बोनसाय


 नात्यांमध्ये बंधन आली की,

नात्यांचं देखील बोनसाय होतं.

भरभरून फुलू पाहणारं नातं,

आतल्या आत चौकटीतच मरून जातं.

               आराधना

Friday, December 11, 2020

संवाद


संवादाने नत्यांमधलं

अंतर मिटून जातं.

हळूवारतेच्या धाग्यांनी

नवीन नातं  जुळून येतं

        आराधना

Thursday, December 10, 2020

आयुष्य


 खोच पदर, सज्ज हो.

हसत हसत लढण्यासाठी सदा.

आयुष्य सुद्धा तुझ्यावर

होईल बघ फिदा.

            आराधना

Wednesday, December 9, 2020

विश्वास


विश्वासाच्या एका नात्यावर

आख्ख भविष्य उभं राहतं.

लाखो संकटांना परतवण्याचं सामर्थ्य

एका विश्वा सात असतं.

         आराधना

Tuesday, December 8, 2020

पूल


 कुणी कुणाच्या आयुष्यात असावं,

हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.

माणूस मात्र उगीचच,

भावनांचा पूल बांधत बसतो.

          आराधना

Monday, December 7, 2020

मनामनावर राज्य करणारा ग्लोबल टीचर


 मनामनावर राज्य करणारा 

              " ग्लोबल टीचर"


  "अनंत आमची ध्येयासक्ती

  अनंत आमची आशा.

  किनारा तुला पामराला"

ध्येय जर प्रबळ आणि प्रगल्भ असेल तर एक सामान्य माणूस ही खूप काही करू शकतो.गरज असते ती दृढ निश्चय,अथक प्रयत्न आणि स्वप्नांवरच्या अतूट विश्वासाची. हा दृढ विश्वासच तुम्हाला अनंत संकटाना परतवून लावून ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा करून देते. या अशाच माणसांमुळे इतिहास घडतो. अशाच एका ध्येयवेड्या शिक्षकाचा प्रवास थक्क करून सोडणारा आहे. सन्माननीय रणजितसिंह डीसले सर,सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेतील प्राथमिक शिक्षक.

  कोणताही बदल हासहजासहजी घडत नाही,पण मनापासून ठरवल तर आपोआप आजूबाजूची परिस्थिती त्याप्रमाण घडत जाते. मनापासून ठरवल तर कोणतीच गोष्ट अवघड आणि अशक्य नाही.

      एक प्राथमिक शिक्षक ते युनेस्को चा सात कोटींचा सन्मान प्राप्त करणारे पहिले भारतीय शिक्षक होण्याचा सन्मान मिळवणारे श्री.रणजितसिंह डीसले सर.सरांची ABP माझा कट्टा वरील मुलाखत ऐकली.

    सातासमुद्रापार पोहोचलेल उत्तुंग व्यक्तिमत्व पण जितकं उत्तुंग तितकच नम्र, विचारी आणि शांत बोलण. शाळेविषयी , शिक्षणा विषयी असणारी तळमळ सर बोलत असताना त्यांच्या प्रत्येक शब्दात जाणवत होती.

     आपल्या शिक्षण पद्धतीतून users (युजर्स) तयार होतात crestors (क्रिएटर) नाही. "क्रिएटर (creator)तयार करणार शिक्षण हवं" हे वाक्य मनाला भावल.माझ्या अध्यापणातून मुलं काय शिकली यापेक्षा त्यांनी त्यातून स्वतः च काय नवीन तयार केलं हे पाहणं ही काळाची गरज आहे.

      शिक्षणात ही अनेक विचार प्रवाह, मतप्रवाह आहेत आहेत. शिक्षक हा सुलभक असावा.विद्यार्थ्यांनी विचार करावा,नवनवीन मार्ग हाताळावे यासाठी पोषक वातावरण शिक्षकांनी तयार करावे अस मत मांडणारे डीसले सर आज शक्य जगात कौतुकास पात्र ठरले.

        मुलं शाळेत रमवायचं आहे ना मग त्याला काय पाहिजे ते शोधा. सरांनी त्यांच्या शाळेत मुलं यावीत, टिकावीत आणि शिकवीत म्हणून सुरवातीला शाळेत पिक्चर दाखवणे हा उपक्रम घेतला. आज मुलांनी पिक्चरचं नाव सांगायचं आणि सरांनी दुसऱ्या दिवशी शाळेत तो पिक्चर दाखवायचा यातून निर्माण झालेली शाळेची गोडी आणि तिथं पासून ते आज पर्यंतच्या शाळेचा झालेला कायापालट ,सरांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेला ग्लोबल टीचर म्हणून सन्मान सगळं एका रात्रीत झाल नाही.

     प्रचंड मेहनत, कष्ट आणि सातत्य यातूनच हे घडलं. इतका मोठा सन्मान होऊनही ५०% रक्कम त्यांच्या बरोबरीन या स्पर्धेत सहभागी झालेल्या सहकाऱ्यांना देणारा हा अवलिया खरोखरच महान आहे. तुम्हाला सात कोटींचा सन्मान तुमच्या कामासाठी आम्ही दिला पण तुम्ही त्यातील अर्धा हिस्सा या इतर स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्यांना का देताय असं विचारल्यावर सराचं उत्तर होत,"एकटा रणजितसिंह डीसले काही करू शकत नाही,क्रांती घडवू शकत नाही त्यासाठी unity हवी.तो ग्रुप त्यांना या शिक्षकां मधून तयार करायचा आहे. याठिकाणी पैसा हा माणसापेक्षा मोठा नसतो हे सरांनी दाखवून दिलं. काम करायचं तर मिळून एका विचारानं, एका ध्येयान वेड होऊन करायचं म्हणजे इतिहास घडतो अशी शिकवण देणारे डीसले सर खरोखरच या कौतुकास पात्र आहेत.

        जगात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांचा २०१८ पासून चालू असलेला "पीस बडी"प्रोजेक्ट. लहानणापासूनच मुलांच्यात शांतीदूत निर्माण करण्याचं त्यांचं स्वप्न,त्यांच्या स्वप्नातील सामर्थ्यशाली भारत,ऐतिहासिक घडू पाहणारी क्रांती हे सगळं ऐकलं आणि नतमस्तक झाले.

   त्यांच्या या कार्याच कौतुक कितीही केलं तरी कमीच आहे.तरीही या शिक्षणयात्रेमधील

एक सहयोगी शिक्षिका म्हणून लिहावस वाटतं,

   प्रयत्नांपुढं  ज्यांच्या

  आभाळानही हात टेकले.

अडचणी सारल्या बाजूला

अन्

यशाचे मार्ग केले मोकळे.

कधीतरीच चमकतो

अवकाशात असा तारा.

आदरणीय डीसले सर,

तुम्ही म्हणजे

शिक्षण क्षेत्रातील अनमोल असा हिरा."

             सौ.आराधना गुरव

                 (प्राथमिक शिक्षिका)

                    वडूज(सातारा)

                    9075829534

सूर


 नातं मग ते कोणतंही आहे

ते महत्वाचं नाही.

नातं मग ते कोणतंही असो,

मनापासून जीव लावला की

माणूस कळतो.

आणि माणूस कळायला

लागला की,

सूर आपोआप जुळतो.

           आराधना

Sunday, December 6, 2020

सामर्थ्य


तळपणाऱ्या सुर्याच्या

नजरेला मिळव नजर.

तुझ्या सामर्थ्या चा साऱ्या

जगात होऊ दे गजर.

               आराधना

Saturday, December 5, 2020

पंख


 का वाटे मज आज पुन्हा ते

पंख माझे  छाटले

क्षितिजापार उडण्याचे

स्वप्न उरी का गोठले?

             आराधना

Friday, December 4, 2020

जगणं


 देह प्रपंचाचा व्याप

व्यर्थ सोडूनी का जावा.

किती येऊ दे संकटे

दोन हात कर सदा.

तू रे माझ्या जीवा.

      आराधना

Thursday, December 3, 2020

मोकळं व्हा


 " मोकळं व्हा"


           वेदनांनो या तुम्हाला

            गूज काही सांगते.

           वेदनेतूनी माझ्या

           नवी कविता जन्मते.

माणूस आणि वेदना यांचं जन्माला येण्या आधीच सख्य आहे. जन्माला येण्याआधी नऊ महिने पोटात एका थेंबापासून पूर्ण मानवी देह धारण करणे ही गोष्ट विना वेदनेची घडूच शकत नाही. गर्भाशयात नऊ महिने त्या उष्ण वातावरणात कितीतरी त्रास सहन करून जन्माला येतानाही भयानक वेदना, घुसमट सहन करून जीव जन्म घेतो अन् जन्म झाला की सुरू होतं ते रडणं. खऱ्या वास्तव आयुष्याची सुरवात ही या रडण्यान होते, उलट बाळ रडलं नाही तर त्याला मुद्दाम चिमटे काढून रडवतात. त्याचा श्वास मोकळा करतात. तिथून मग आयुष्याचा प्रवास सुरू होतो. वेदना, क्लेश, राग, दुःख,आनंद, राग, लोभ अशा संमिश्र भावनांनी आयुष्य रंगत जात.

         लहान बाळ अस रडत, हसत मोठं होत. कितीही रागवा, ओरडा, मारा, शिक्षा करा ते रडतं, रुसत पण प्रेमाची एक हाक, प्रेमाचा एक स्पर्श मिळाला की तो राग, वेदना, रुसवा विसरून पटकन हसून उड्या मारायला सूरवात करत.

      वेदनेवर औषध हे फक्त प्रेमाचं,मायेचं अन् आपुलकीचं असतं. बाहेरील जखम, वेदना ही दवाखान्यात जाऊन, गोळ्या घेऊन कमी होते पण मनाची वेदना बरी करायला प्रेमाची फुंकर आणि मायेचा मलम च लागतो.

        असं म्हणतात जग बदलतंय.पाहिल्यासारखं माणस बोलत नाहीत. हसत नाहीत अगदी रडत ही नाहीत. माणसा माणसातील संवाद लोप पावत चालला आहे.जग बदललं म्हणून दुःख,वेदना, संकट कमी झाली नाहीत तर ती वाढलीत कारण या नव्या जगान संवाद हिरावून घेतला. पिसाटल्यासारख माणूस या मायावी जगाच्या माग धावतोय

बंगला, गाडी, नोकर चाकर, पैसा, प्रसिध्दी सगळ ऐश्वर्य हात जोडून उभ असूनही या सुखाचा उपभोग घ्यायचा सोडून अजुन थोड पुढं जाऊया म्हणून माणूस धावतोय. नुसता धावतोय मान पान, प्रसिध्दी अन् मृगळाच्या मागं. झंझावातासारखं धावतोय. बोलायला वेळ नाही. खायला इतकचं काय पाणी प्यायला ही वेळ नाही. अरे! काय चाललय. काय हे? मान्य आहे पळाव माणसानं पण इतकं. हे थांबायला हवं कुठेतरी. आयुष्यात ज्याला कुठं थांबायचं हे कळलं ना तोच समाधान मिळवू शकतो. खर आयुष्य उपभोगू शकतो बाकीचे फक्त जगतात . मरण येत नाही म्हणून जगतात.

         दिवसभर काम करून आल्यावर संध्याकाळी एकत्र बसून जेवण करताना होणारा संवाद आज दिसत नाही. जो तो ज्याचं त्याचं आयुष्य जगतोय. घरात प्रत्येकाला स्वतची वेगळी स्पेस दिली जाते. त्यात इतर कुणी लुडबुड करायची नाही. हसणं, खेळणं, खिदळण गायब. यातूनच एकाकीपणा वाढतो. माणूस प्रगती करत असतो, यश मिळवतो. नशा चढते या यशाची आणि झिंगवून टाकते आयुष्य सगळं. पण कधीतरी अशा एका टप्प्यावर आयुष्य येऊन ठेपत की जेव्हा कधी आयुष्यात निराशा येते तेव्हा ते पचवण्याची मानसिक ताकद, शक्ती माणसात उरतं नाही.नैराश्य, अपयश पचवण्यासाठी आवश्यक भावनांचा संवाद, प्रेम, माया त्याने लहानपणापासून मिळवण्याचा प्रयत्न च केलेला नसतो

   स्वतःची स्पेस या गोंडस नावाखाली माणूस स्वतः ला कोंडून घेतो स्वतःच्या भावनांना. गप्पा, हासयविनोद त्याच्या आयुष्याचा भाग नसतात. फक्त पैसा, यश, मानमरातब व्यवहारिक हाय हॅलो हेच यांचं आयुष्य असतं. यश मिळवलं,आनंद झाला की अभिनंदन आणि दुःखद बातमी असली की R I P किंवा भावपूर्ण श्रद्धांजली इतक्या तोकड्या शब्दात आपण भावना बांधून ठेवल्यात.

         तुम्हीच सांगा कसा होणार नाही कोंडमारा. माणस आहोत आपण जिवंत. भावभावना श्वासासोबत घेऊन जगणारी. हसू वाटलं की हसलं पाहिजे. रडू वाटेल तेव्हा भावनांचा गोंधळ थांबेपर्यंत रडलं पाहिजे. एकमेकींच्या हातावर टाळ्या देऊन , पाठीत चार धपाटे घालून मित्र मैत्रिणींची छान गप्पांची मैफिल रंगली पाहिजे. मैत्रीण दिसली अन् गळ्यात पडून मिठी मारावी वाटली की मिठी मारली पाहिजे. कितीसं आयुष्य आहे आपलं. आत्ता हसत असणारी माणस अशी बघता बघता क्षणात निघून जातात या निराशेपोटी.

        स्ट्रेस, वेदना, दुःख घालणारा मित्र मैत्रिणींचा कट्टा कदाचित त्यांच्याकडे नसतो म्हणूनच फुलपाखराचे पंख छाटून आयुष्य संपवाव इतक्या पटकन मरणाच्या गळ्यात ती हार घालतात 

     मित्रांनो अजूनही वेळ गेली नाह आयुष्य खूप सुंदर आहे. दुःख, वेदना असल्याने उलट ते अधिक सुंदर बनत. या वेदना तुम्हाला तुमची माणसं,तुमचा संवाद मिळवून देतात. मरणाच्या दारात असताना सुद्धा," तुम हो तो ग्रुप मे जान है!"

"काय राव असं एकटं एकटं आजारी पडायचं असंतयं व्हय."जेवतेस की नाही नाहीतर दोन फटके मारीन हं. असे हक्कान मारणारे तितकच निखळ प्रेम करणारे मित्र मैत्रिणी कितीही जीवघेणा आजार असू द्या, दुःख असू दया आपल्याला सहज बाहेर काढतात.

मित्रानो म्हणूनच मोकळं व्हा. बोला, रडा, हसा, भांडा, पण मोकळं व्हा. आयुष्यातून मोकळं होण्यापेक्षा भावनांना मोकळं करण केव्हाही चांगलं.

     संवादानं मैत्रीची, रक्ताच्या जीवाभावाच्या नात्यांची गुंफण घट्ट होते. निराशेने वेड होऊन आयुष्य संपवण्यापेक्षा,

   "  वेदनांनो या अशा या

      पुन्हा पुन्हा या जीवनी

      तुमच्या साथीनेच मिळते

       या जगण्याला नवी उभारी."

अस म्हणून वेदनांशी मैत्री करा. मित्र मैत्रिणीच्या हास्याच्या खळखळाटात वेदनांनाच मोकळं करा. मित्रांनो मोकळं व्हा! मोकळं होऊन जगण्यातला आनंद लुटा. एक सुंदर आयुष्य वाट बघतय तुमची हसत हसत त्याला टाळी देण्याची.तेव्हा मोकळं व्हा आणि मनमुराद भरपूर जगा.

            सौ.आराधना गुरव

               वडूज (सातारा)

                  ९०७५८२९५३४

वेदना


वेदनांनो  या अशा या

पुन्हा पुन्हा या जीवनी.

तुमच्या साथीने च मिळते

या जगण्याला नवी उभारी.

Wednesday, December 2, 2020

मैत्री


मायेचा हात.

पाठीवरती थाप.

खळखळणार हास्य.

हवं तेव्हा गळ्यात पडून रडणार.

मैत्री नावाचं रहस्य.

अर्धा कप कटिंग.

हीच तर असते

मैत्रीच्या कट्ट्या वरची

सेटिंग.

  आराधना


Tuesday, December 1, 2020

गुलकंद


 नसतील हात मदतीचे

जाणिवाही होतील थंड.

यातच तर खरा असतो

आयुष्य जगण्याचा गुलकंद.

                  आराधना

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही