Thursday, December 3, 2020

मोकळं व्हा


 " मोकळं व्हा"


           वेदनांनो या तुम्हाला

            गूज काही सांगते.

           वेदनेतूनी माझ्या

           नवी कविता जन्मते.

माणूस आणि वेदना यांचं जन्माला येण्या आधीच सख्य आहे. जन्माला येण्याआधी नऊ महिने पोटात एका थेंबापासून पूर्ण मानवी देह धारण करणे ही गोष्ट विना वेदनेची घडूच शकत नाही. गर्भाशयात नऊ महिने त्या उष्ण वातावरणात कितीतरी त्रास सहन करून जन्माला येतानाही भयानक वेदना, घुसमट सहन करून जीव जन्म घेतो अन् जन्म झाला की सुरू होतं ते रडणं. खऱ्या वास्तव आयुष्याची सुरवात ही या रडण्यान होते, उलट बाळ रडलं नाही तर त्याला मुद्दाम चिमटे काढून रडवतात. त्याचा श्वास मोकळा करतात. तिथून मग आयुष्याचा प्रवास सुरू होतो. वेदना, क्लेश, राग, दुःख,आनंद, राग, लोभ अशा संमिश्र भावनांनी आयुष्य रंगत जात.

         लहान बाळ अस रडत, हसत मोठं होत. कितीही रागवा, ओरडा, मारा, शिक्षा करा ते रडतं, रुसत पण प्रेमाची एक हाक, प्रेमाचा एक स्पर्श मिळाला की तो राग, वेदना, रुसवा विसरून पटकन हसून उड्या मारायला सूरवात करत.

      वेदनेवर औषध हे फक्त प्रेमाचं,मायेचं अन् आपुलकीचं असतं. बाहेरील जखम, वेदना ही दवाखान्यात जाऊन, गोळ्या घेऊन कमी होते पण मनाची वेदना बरी करायला प्रेमाची फुंकर आणि मायेचा मलम च लागतो.

        असं म्हणतात जग बदलतंय.पाहिल्यासारखं माणस बोलत नाहीत. हसत नाहीत अगदी रडत ही नाहीत. माणसा माणसातील संवाद लोप पावत चालला आहे.जग बदललं म्हणून दुःख,वेदना, संकट कमी झाली नाहीत तर ती वाढलीत कारण या नव्या जगान संवाद हिरावून घेतला. पिसाटल्यासारख माणूस या मायावी जगाच्या माग धावतोय

बंगला, गाडी, नोकर चाकर, पैसा, प्रसिध्दी सगळ ऐश्वर्य हात जोडून उभ असूनही या सुखाचा उपभोग घ्यायचा सोडून अजुन थोड पुढं जाऊया म्हणून माणूस धावतोय. नुसता धावतोय मान पान, प्रसिध्दी अन् मृगळाच्या मागं. झंझावातासारखं धावतोय. बोलायला वेळ नाही. खायला इतकचं काय पाणी प्यायला ही वेळ नाही. अरे! काय चाललय. काय हे? मान्य आहे पळाव माणसानं पण इतकं. हे थांबायला हवं कुठेतरी. आयुष्यात ज्याला कुठं थांबायचं हे कळलं ना तोच समाधान मिळवू शकतो. खर आयुष्य उपभोगू शकतो बाकीचे फक्त जगतात . मरण येत नाही म्हणून जगतात.

         दिवसभर काम करून आल्यावर संध्याकाळी एकत्र बसून जेवण करताना होणारा संवाद आज दिसत नाही. जो तो ज्याचं त्याचं आयुष्य जगतोय. घरात प्रत्येकाला स्वतची वेगळी स्पेस दिली जाते. त्यात इतर कुणी लुडबुड करायची नाही. हसणं, खेळणं, खिदळण गायब. यातूनच एकाकीपणा वाढतो. माणूस प्रगती करत असतो, यश मिळवतो. नशा चढते या यशाची आणि झिंगवून टाकते आयुष्य सगळं. पण कधीतरी अशा एका टप्प्यावर आयुष्य येऊन ठेपत की जेव्हा कधी आयुष्यात निराशा येते तेव्हा ते पचवण्याची मानसिक ताकद, शक्ती माणसात उरतं नाही.नैराश्य, अपयश पचवण्यासाठी आवश्यक भावनांचा संवाद, प्रेम, माया त्याने लहानपणापासून मिळवण्याचा प्रयत्न च केलेला नसतो

   स्वतःची स्पेस या गोंडस नावाखाली माणूस स्वतः ला कोंडून घेतो स्वतःच्या भावनांना. गप्पा, हासयविनोद त्याच्या आयुष्याचा भाग नसतात. फक्त पैसा, यश, मानमरातब व्यवहारिक हाय हॅलो हेच यांचं आयुष्य असतं. यश मिळवलं,आनंद झाला की अभिनंदन आणि दुःखद बातमी असली की R I P किंवा भावपूर्ण श्रद्धांजली इतक्या तोकड्या शब्दात आपण भावना बांधून ठेवल्यात.

         तुम्हीच सांगा कसा होणार नाही कोंडमारा. माणस आहोत आपण जिवंत. भावभावना श्वासासोबत घेऊन जगणारी. हसू वाटलं की हसलं पाहिजे. रडू वाटेल तेव्हा भावनांचा गोंधळ थांबेपर्यंत रडलं पाहिजे. एकमेकींच्या हातावर टाळ्या देऊन , पाठीत चार धपाटे घालून मित्र मैत्रिणींची छान गप्पांची मैफिल रंगली पाहिजे. मैत्रीण दिसली अन् गळ्यात पडून मिठी मारावी वाटली की मिठी मारली पाहिजे. कितीसं आयुष्य आहे आपलं. आत्ता हसत असणारी माणस अशी बघता बघता क्षणात निघून जातात या निराशेपोटी.

        स्ट्रेस, वेदना, दुःख घालणारा मित्र मैत्रिणींचा कट्टा कदाचित त्यांच्याकडे नसतो म्हणूनच फुलपाखराचे पंख छाटून आयुष्य संपवाव इतक्या पटकन मरणाच्या गळ्यात ती हार घालतात 

     मित्रांनो अजूनही वेळ गेली नाह आयुष्य खूप सुंदर आहे. दुःख, वेदना असल्याने उलट ते अधिक सुंदर बनत. या वेदना तुम्हाला तुमची माणसं,तुमचा संवाद मिळवून देतात. मरणाच्या दारात असताना सुद्धा," तुम हो तो ग्रुप मे जान है!"

"काय राव असं एकटं एकटं आजारी पडायचं असंतयं व्हय."जेवतेस की नाही नाहीतर दोन फटके मारीन हं. असे हक्कान मारणारे तितकच निखळ प्रेम करणारे मित्र मैत्रिणी कितीही जीवघेणा आजार असू द्या, दुःख असू दया आपल्याला सहज बाहेर काढतात.

मित्रानो म्हणूनच मोकळं व्हा. बोला, रडा, हसा, भांडा, पण मोकळं व्हा. आयुष्यातून मोकळं होण्यापेक्षा भावनांना मोकळं करण केव्हाही चांगलं.

     संवादानं मैत्रीची, रक्ताच्या जीवाभावाच्या नात्यांची गुंफण घट्ट होते. निराशेने वेड होऊन आयुष्य संपवण्यापेक्षा,

   "  वेदनांनो या अशा या

      पुन्हा पुन्हा या जीवनी

      तुमच्या साथीनेच मिळते

       या जगण्याला नवी उभारी."

अस म्हणून वेदनांशी मैत्री करा. मित्र मैत्रिणीच्या हास्याच्या खळखळाटात वेदनांनाच मोकळं करा. मित्रांनो मोकळं व्हा! मोकळं होऊन जगण्यातला आनंद लुटा. एक सुंदर आयुष्य वाट बघतय तुमची हसत हसत त्याला टाळी देण्याची.तेव्हा मोकळं व्हा आणि मनमुराद भरपूर जगा.

            सौ.आराधना गुरव

               वडूज (सातारा)

                  ९०७५८२९५३४

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही