Saturday, April 30, 2022

महाराष्ट्र दिन


 लढण्या शिकवते,

झगडण्या शिकवते

देते क्रांतीची प्रेरणा.

माय मराठी महाराष्ट्र माऊली

सदा जागवते नव चेतना.

लाख येवो संकटे आणि

होवोत किती ही वार 

तुझी लेकरे आई आम्ही

कधीच नाही थकणार.

गाथा तुझी अभंग राहिलं

झेंडा तुझाच हिमशिखरी

फडफडणार


Friday, April 29, 2022

दुवा


 स्वाभिमानाने जगण्याचे स्वप्न

आपण जेव्हा पाहतो.

दुवा होऊन तेव्हा अखंड

पाऊस बरसत राहतो.

Thursday, April 28, 2022

सांकव


 वाटेवरच्या काट्यांनाही

 हळुवारपणे वेचावे 

सांकव बनवून त्यांचाच

ध्येयाला अलगद मिठीत घ्यावे 

Wednesday, April 27, 2022

धागा


 आपल्या अंतर्मनातील

सामर्थ्याचा धागा अचूक पकडायचा.

त्याच्या सोबतीनेच मग

यशाचा सोनेरी गोफ विणायचा.

Tuesday, April 26, 2022

स्वच्छंदी


 स्वतःमधेच रमणारी माणसं

स्वच्छंदी आयुष्य जगतात.

असं स्वच्छंदी आयुष्य

 जगणारी माणसचं

स्वतःचा नवा इतिहास लिहितात

Monday, April 25, 2022

बीज


 एक एक पाऊल आता

सामर्थ्याने पुढे टाकते आहे.

रोजचं नव्याने मनात आता

नवनिर्मितीचं बीज परते आहे.


Sunday, April 24, 2022

गाणं


 मनानं आता ठरवलंय 

फक्त उजेडचं पेरत राहायचं

किती ही असू दे अंधार

फक्त प्रकाशाचं गाणं गायचं.

Saturday, April 23, 2022

तरंग


 आता रोजचा दिवस आयुष्यात

नवीन तरंग घेऊन उगवतो.

प्रत्येक लाटेतून तरून बाहेर निघण्याची

जणू वेगळीच उमेद देऊन जातो

Friday, April 22, 2022

कोंदण


 मनावरचा प्रत्येक घाव

काळीज कोंदणात

हळुवारपणे जपावा.

त्याच्या प्रत्येक आठवणीतूनच तर मिळतो

यशाचे शिखर गाठण्यासाठी

सामर्थ्याचा ठेवा

Thursday, April 21, 2022

तेज


 समाधानाने जगायला शिकलं की

सुख आपोआप गालात हसू लागतं

चैतन्याचं तेज तेव्हा चेहऱ्यावर

आपोआपच खुलून येतं

Wednesday, April 20, 2022

वारा


 वाऱ्याची मंद झुळूक 

जशी हवीहवीशी वाटते

तसाच सोसाट्याच्या वाराही

हवाहवासा वाटावा.

त्याच्या प्रत्येक लाटेतून

आशेचा सोनेरी किरण गवसावा


Tuesday, April 19, 2022

माणूस


 माणूस वाचायला शिकलं की

मनाचं सामर्थ्य आपोआपच वाढत जातं.

हेच सामर्थ्य तुम्हाला मग

अटकेपार घेऊन जातं

Monday, April 18, 2022

मैत्री


 अंधाराशी मैत्री केली

अन् नवसूर्यचा उदय झाला.

विश्वासाच्या एका ज्योतीने

युगायुगांचा अंधार निमाला.

Sunday, April 17, 2022

सूर्य


 मावळतीचा सूर्य

पुन्हा नव्याने उगवण्याची

आशा घेऊन मावळतो.

निराशेच्या गर्तेत सापडलेल्या

प्रत्येकालाच सकारात्मकतेचा 

जणू मूक संदेश देतो.

Saturday, April 16, 2022

पालवी


 जिद्दीला जेव्हा प्रामाणिक

प्रयत्नांची जोड मिळते

वठलेल्या झाडालाही तेव्हा

हसत खेळत पालवी फुटते

Friday, April 15, 2022

सुरवात


 आनंदाने जगण्यासाठी

आता कारण लागत नाही.

नव्याने बहरण्यासाठी

वसंताची गरज लागत नाही.

मीच वसंत अन् मीच वैशाख

नव्याने सुरवात करण्यासाठी आता

कुणाची मदत लागत नाही

Thursday, April 14, 2022

सूर्य


 वादळाशी लढण्यासाठी जन्म घेतला की

सूर्य सुद्धा तुमच्यासाठी क्षणभर थांबतो

तोच मग तुमच्या स्वप्नांसाठी 

त्याची अद्भुत शक्ती तुम्हाला देतो.


Wednesday, April 13, 2022

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती


 स्वातंत्र्याचा अर्थ तुम्ही

समजावून सांगितला.

मोजू कशी सांगा तुमच्या

अनमोल कर्तुत्वाला.

तळपणाऱ्या सुर्यासम

तेज तुमचे झळकले.

भिमराय नाव म्हणून तर

मनामनात कोरले.

Tuesday, April 12, 2022

ध्येय


 ओंजळीत मावेल एवढंच घेत राहावं

आपली क्षमता बघूनच

आपण पळत राहावं

शर्यतीत न उतरता ही

आपल्या वेगाने मार्गक्रमण करून

ध्येय गाठत राहायचं


Monday, April 11, 2022

समाधान


सुखाच्या मागे न पळता

समाधान शोधत राहावं.

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा

मनमुराद आनंद घेत जगावं.

Sunday, April 10, 2022

गारवा


 आयुष्यातील प्रत्येक क्षण आता

सुखद गारवा देऊन जातो.

उगवत्या सूर्याच्या साक्षीने रोज

नवा आनंद घेऊन येतो

Saturday, April 9, 2022

गाथा


 मनातील सारी कोडी

आता शब्दांनीच सोडवली

म्हणूनच तर आयुष्याची गाथा

नव्याने पुन्हा उलगडली

Friday, April 8, 2022

वादळ


 एक एक वादळ असं

अलगद कवेत घेतेय.

म्हणूनच की काय 

रोज नव्या उमेदीने अन्

नव चैत्यन्याने न्हावून निघतेय

Thursday, April 7, 2022

क्षण


 आयुष्यातील प्रत्येक क्षण आता

नव्याने जगते आहे.

वैशाख असो की वसंत असो

आता मनमुराद फुलते आहे

Wednesday, April 6, 2022

सहनशक्ती


 सहनशक्ती वाढावी म्हणूनच की काय

वेदना पुन्हा पुन्हा जन्म घेतात

त्यांच्या सोबत जगता जगता

हसत हसत तुमच्याशीच मैत्री करतात.

Tuesday, April 5, 2022

ओढ


तुमच्या ध्येयाप्रती 

तुमच्या अंतर्मनाची असणारी ओढ

तुम्हाला अदुभत सामर्थ्य देऊन जाते.

युगायुगांचा काळोख दूर करून

तुमची प्रत्येक वाट उजळून टाकते

Monday, April 4, 2022

चांदणं



सतत नव्या जाणीवा घेऊन

वेड मन  फुलत राहतं

अंगणात माझ्या म्हणूनच

यशाचं चांदण सदा पसरत 


Sunday, April 3, 2022

पावलं


 नाविन्याचा ध्यास असणारी पावलं

कधीच थकत  नसतात

म्हणून तर अवघड वाटणारी त्यांची स्वप्न

सहजतेने पूर्ण होतात


Saturday, April 2, 2022

संधी

 नव्याने येणाऱ्या प्रत्येक क्षणासाठी


सदैव तयार राहायचं

आयुष्यातील प्रत्येक आव्हानाकडे

एक नवी संधी म्हणून

पहात राहायचं.

Friday, April 1, 2022

गुढीपाडवा


 चैत्र चाहूल लागली

अंगणी सजली गुढी

कडू गोड आठवणींची

आज पडली मिठी.

दूरवरचा प्रकाश

आज दारी पसरला

देण्या यशाचं वरदान

चैत्र अंगणी फुलला


जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही