Aradhanagurav marathi kavita
Thursday, March 12, 2026
Thursday, October 12, 2023
मावळती
उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात
मावळती पुढे ही
तितक्याच ताकदीने झुकता आलं पाहिजे
निराशेच्या ढगांची चादर पांघरून
निवांत झोपता आलं पाहिजे
Saturday, September 9, 2023
Saturday, December 31, 2022
नवा सूर्योदय
*नवा सूर्योदय*
उगवत्या सूर्याला अर्ध्य देणारी आपली संस्कृती आहे. येणारा प्रत्येक दिवस नवीन सूर्य घेऊन येतो. आता तुम्ही म्हणाल सूर्य तर रोज उगवतो त्याच काय नवीन असणार ? पण तसं नाही. सूर्य जरी रोज उगवत असला तरी उगवणारा प्रत्येक सूर्य नव्याने बघण्यात जीवनाची खरी गंमत आहे.
*जुने जाऊ द्या मरणा लागुनी*
*जाळून अथवा फुंकून टाका*
कालचा सूर्य मावळला. असत्याचा, अकर्माचा, अविचारांचा नाश झाला. आजचा सूर्य नवीन आहे. उद्याचा आणखीनचं नवीन असेल, असे विचार त्या सूर्याकडे बघून मनात यायला हवेत.
तुम्हाला वाटेल मी हे सगळं का सांगतेय ? मी हे सांगतेय कारण उद्या ३१ डिसेंबर येतोय. ३१ डिसेंबर ची रात्र उजाडेल ती नव्या वर्षाच्या सूर्याला कवेत घेऊनच . हा नवा सूर्य नवीन प्रकाश, नव्या आशा , नव्या आकांक्षा, स्वप्न सगळं काही घेऊन येणारे. म्हणूनच म्हणते येणाऱ्या या नव्या सूर्याचं हसतमुखाने स्वागत करा. त्यालाही वाटावं आपल्या येण्याने किती आनंद झालाय सगळ्यांना.
नवीन येणाऱ्या बाळाची चाहूल जितकी सुखद गोड असते. त्या बाळाच्या आगमनाची प्रत्येक जाणीव आपण जेवढ्या आनंदाने स्वीकारतो तेवढ्याच आनंदाने या येणाऱ्या नवीन वर्षाला स्वीकारले पाहिजे.
कित्येकदा असं होतं आपण विचार करतो मागच्या वर्षी मला किती वाईट अनुभव आला. मला किती त्रास झाला, माझ्या बाबतीत नेहमी वाईट झालं. असा निगेटिव्ह विचार करीत करीतच नव वर्षही येतं. पण जुने वाईट अनुभवांचे विचार काही आपण सोडत नाही. मनात असं वाईट विचारांचा जाळ निर्माण झाल्याने पुन्हा येणारे अनुभवही आपल्याला वाईटच असतात. म्हणूनच या नवीन वर्षात एक करा . सोडून द्या ती वाईट विचारांची, वाईट अनुभवांची जळमट. नवीन वर्षाचे स्वागत नव्या विचारांनी करा. असा विचार करा की आलेल कटू अनुभव, संकट, अडचणी मला आल्या कारण ते पेलण्याचं सामर्थ्य परमेश्वराने मला दिले . या वाईट अनुभवानंतरही माझ्या आयुष्यात रोज नवा सूर्योदय झाला. कारण ईश्वराला माझ्या मनात विचारांचा सूर्योदय करायचा होता. माझ्या मनात निश्चलता, अढळता, जिद्द, चिकाटी, विश्वास निर्माण करायचा होता. आज पुन्हा नवीन वर्ष येतंय माझं नव्यानं स्वागत करायला . मलाही त्याला सामोरे जायला हवं. पण रडतखडत नाही, हसतमुखानं , नव्या उत्साहानं.
लहान तान्ह्या बाळाला कुशीत घ्यायला आई जितकी आतुर असते, तेवढेच आतुर होऊन या नव्या वर्षाचे स्वागत करा.
नवीन वर्षात परमेश्वराला काही मागूच नका. आणि मागायचं असेल तर इतकच मागा की तू जे देशील ते आनंदाने स्वीकारण्याचा सामर्थ्य दे. ईश्वराच्या देण्यावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला जे देईल त्याचा आनंदाने स्वीकार करा. येणारा प्रत्येक अनुभव सकारात्मक दृष्टीने पहा. लहान बाळ रडलं तर आपण रडतो का ? नाही ना ? उलट अजून ते लहान आहे असं समजून त्याला हसवण्याचा प्रयत्न करतो.
अगदी तसंच येणाऱ्या वर्षातील प्रत्येक अनुभव मग तो चांगला असो वा वाईट असो तो आनंदाने फुलवण्याचा प्रयत्न करा.
नवीन वर्षात स्वतः नाराज, निराश होण्यापेक्षा नवीन वर्षालाच नाराज करू नका .
नवीन वर्षातील प्रत्येक दिवसाला प्रत्येक क्षणाला विश्वास द्या . कितीही आणि काही झालं तरी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मी ढळू देणार नाही .
मग बघा नवीन वर्षातील येणारा क्षण कसा फुलतो ते. रोज नव्याने उगवणाऱ्या फुलासारखा .
*सूर्याला नव्याने उगवू द्या*
*फुलाला नव्याने फुलू द्या* . त्याच्याबरोबर तुम्हीही फुला. आनंदाच्या आकाशात स्वछंदपणे भरारी मारा. क्षितिजाच्या पलीकडे जाऊन पोहोचा. जिथे कोणीतरी तुमची वाट पाहत असेल. कोण असेल ते माहितेय ? नवा सूर्योदय, सुख, आनंद ओंजळीत घेऊन थांबलेला. तुमच्यावर आनंदाच्या किरणांची बरसात करण्यासाठी. त्या सोनेरी किरणांच्या प्रकाशात न्हाऊन निघा आणि वाट पहा असा सूर्योदय पुन्हा होण्याची.
*
*सौ. आराधना गुरव*
9075829534
*मु. पो. वडूज ता. खटाव जि. सातारा*
Wednesday, November 9, 2022
Sunday, October 23, 2022
माणुसकीचा एक दिवा
माणुसकीचा दिवा
*माणुसकीचा* *दिवा*
बघता बघता दिवाळी आली. गेले दोन वर्ष कोरोनाच्या भयाण सावटाखाली घुसमटलेलं आयुष्य नव्या उमेदीने कामाला लागल.
दिवाळी आली अन् सोबत नवा विश्वास नवा विचार घेऊन आली. दिवाळी! वर्षातील सगळ्यात मोठा आनंदाचा सण. गरीब, श्रीमंत प्रत्येकजण आपल्या आपल्या ऐपती प्रमाणे साजरा करतो तो हा दिवाळी चा सण.
पणत्यांचा लखलखाट, खमंग पदार्थांचा घमघमनारा वास, उटणं लावून केली जाणारी मोती साबणाची आंघोळ, दारापुढे काढलेली सुबक रांगोळी, फटाक्यांचा आवाज आणखीन काय सांगू? करावं तेवढं वर्णन कमीच वाटेल.
दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास. रोषणाईचा सण. अंधारावर केली जाणारी मात. गेली दोन वर्ष ज्या भयाण अंधारात आपण जगण्यासाठी चाचपडत होतो ती भीती, ती घुसमट, ते मळभ थोड दूर झालं.
दिवाळीच्या निमित्ताने खरेदी सुरू झाली असेल. फराळ तयार झाला असेल. बच्चे कंपनी फटाक्यात, किल्ला करण्यात गुंग असेल. घरासमोरच अंगण रांगोळीने छान खुलून दिसत असेल.
काही क्षणापुरतं का होईना पण कोरोनाच्या विचारातून मन बाजूला पडलं असेल. आजुबाजूच वातावरण छान प्रसन्न असेल. सणादिवशी नवीन कपड्यांनी सगळं घरं हसेल,
खुलेल. आणि खुलयलाच हवं कारण दिवाळी आली. हे सण असतात तरी कशासाठी तर आयुष्यात आनंदाची पेरणी करण्यासाठी. अंधारातही हसणारे प्रकाशाचे कवडसे शोधण्यासाठी. सकारात्मकतेची रुजवणुक करण्यासाठी आणि म्हणून सण साजरे करावेत. जशी परिस्थिती असेल तशाही परिस्थिती सकारात्मकतेचा धागा शोधून या सणांना हळूवारपणे गोड आठवणीत गुंफता यायला हवं.
थोरामोठ्यां्या घरात असते तशी रोषणाई भलेही नसेल, गच्च भरलेले फराळाचे डबे कदाचित प्रत्येकाला मिळणार नाहीत पण नवे कपडे, फटाके, नसतील प्रत्येकाच्या नशिबात पण सण साजरा करण्याचा हक्क तर प्रत्येकाला आहे आणि मला त्या साठी पाऊल उचलायच आहे हा विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजायला हवा. मनात माणुसकीचा सूर्योदय व्हायला हवा.
मी, माझं सोडून देऊया हा विचार. सणादिवशी माझं घर हसतय , नव्या कपड्यांनी बालपण अंगणभर नाचतय, स्वयंपाकघर फराळाच्या पदार्थांनी छान घमघमतय माझं मजेत चाललय. इतक्या साध्या शब्दांत माझी दिवाळी कशी होऊ शकेल कारण माझं घर चैतन्याने रोषणाईने भरून गेलंय पण... मंडळी याच वेळी कुठंतरी, कुणीतरी अंधारात पोटासाठी दोन घासाची याचना करीत असेल. त्यांना ना कपडे, ना उटण. पंचपक्वान्न त्यांच्या नशिबात कुठून येणार?
बाहेर जग झगमगत असेल पण त्यांच्यावर प्रकाश पडत नसेल. त्यांची ही मुलं असतील. केविलवाणी तोंड करून आपल्याला पहात असतील. आपल्या आणि त्यांच्या जगण्यातला फरक नाही कळणार त्यांना. आणि फरक तरी का असावा?
आपण जशी माणस तशीच तीपण माणसचं की. मग वाट कसली बघायची. दिवाळीचा नैवेद्य देवाला दाखवूया तसेच माणसातल्या देवांना देऊया. जाऊ दया चार पैसे पण य त्यांना अंगभर कपडे देऊया. आपल्या मुलांसारखा त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद खुलवूया.
आधीपासूनच झगमगत असणाऱ्या दुनियेत प्रकाश निर्माण न करता
जिथे खरंच अंधाराचं साम्राज्य आहे तिथे प्रकाशाचा छोटासा का होईना कवडसा बनण्याचा प्रयत्न करू या.
एक ,फक्त एक दिवा लावुया माणुसकीचा माझ्या, तुमच्या,आपल्या सगळ्यांच्या मनात. या दिवाळसणाच्या निमित्ताने माणुसकीचा प्रकाश सगळीकडे पोहोचवूया.या वर्षी पासून साजरी करूया माणुसकीची दिवाळी. आपल्या प्रमाणे इतरांचे ही जगणे सुंदर करू या. या दिवाळीत फक्त आनंद पेरू या.
"हे जगणे सुंदर व्हावे
हे मरणे सुंदर व्हावे
मनामनांतील भेदून भिंती
अवघे विश्चची एक व्हावे.
सामर्थ्याचा तव ठेवा
प्रत्येक घरांस मिळावा
दिपज्योतीच्या साक्षीने
यशाचे द्वार उघडे व्हावे.
चिमुकल्या त्या पावलांना
नवचैतन्य देता यावे
गळून जावी भीती सारी
सृजनाचे चांदणे बरसावे."
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
सौ आराधना गुरव
9075829534
वडूज
ता.खटाव जिल्हा - सातारा
-
मावळतीचा सूर्य पुन्हा नव्याने उगवण्याची आशा घेऊन मावळतो. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या प्रत्येकालाच सकारात्मकतेचा जणू मूक संदेश देतो.
-
कोणत्या दिशेने जावं आणि कुठं थांबावं हे ज्याचं त्यालाच कळाव. ज्याचं त्याचं आयुष्य ज्याला त्यालाच सावरता यावं अर्...






