*नवा सूर्योदय*
उगवत्या सूर्याला अर्ध्य देणारी आपली संस्कृती आहे. येणारा प्रत्येक दिवस नवीन सूर्य घेऊन येतो. आता तुम्ही म्हणाल सूर्य तर रोज उगवतो त्याच काय नवीन असणार ? पण तसं नाही. सूर्य जरी रोज उगवत असला तरी उगवणारा प्रत्येक सूर्य नव्याने बघण्यात जीवनाची खरी गंमत आहे.
*जुने जाऊ द्या मरणा लागुनी*
*जाळून अथवा फुंकून टाका*
कालचा सूर्य मावळला. असत्याचा, अकर्माचा, अविचारांचा नाश झाला. आजचा सूर्य नवीन आहे. उद्याचा आणखीनचं नवीन असेल, असे विचार त्या सूर्याकडे बघून मनात यायला हवेत.
तुम्हाला वाटेल मी हे सगळं का सांगतेय ? मी हे सांगतेय कारण उद्या ३१ डिसेंबर येतोय. ३१ डिसेंबर ची रात्र उजाडेल ती नव्या वर्षाच्या सूर्याला कवेत घेऊनच . हा नवा सूर्य नवीन प्रकाश, नव्या आशा , नव्या आकांक्षा, स्वप्न सगळं काही घेऊन येणारे. म्हणूनच म्हणते येणाऱ्या या नव्या सूर्याचं हसतमुखाने स्वागत करा. त्यालाही वाटावं आपल्या येण्याने किती आनंद झालाय सगळ्यांना.
नवीन येणाऱ्या बाळाची चाहूल जितकी सुखद गोड असते. त्या बाळाच्या आगमनाची प्रत्येक जाणीव आपण जेवढ्या आनंदाने स्वीकारतो तेवढ्याच आनंदाने या येणाऱ्या नवीन वर्षाला स्वीकारले पाहिजे.
कित्येकदा असं होतं आपण विचार करतो मागच्या वर्षी मला किती वाईट अनुभव आला. मला किती त्रास झाला, माझ्या बाबतीत नेहमी वाईट झालं. असा निगेटिव्ह विचार करीत करीतच नव वर्षही येतं. पण जुने वाईट अनुभवांचे विचार काही आपण सोडत नाही. मनात असं वाईट विचारांचा जाळ निर्माण झाल्याने पुन्हा येणारे अनुभवही आपल्याला वाईटच असतात. म्हणूनच या नवीन वर्षात एक करा . सोडून द्या ती वाईट विचारांची, वाईट अनुभवांची जळमट. नवीन वर्षाचे स्वागत नव्या विचारांनी करा. असा विचार करा की आलेल कटू अनुभव, संकट, अडचणी मला आल्या कारण ते पेलण्याचं सामर्थ्य परमेश्वराने मला दिले . या वाईट अनुभवानंतरही माझ्या आयुष्यात रोज नवा सूर्योदय झाला. कारण ईश्वराला माझ्या मनात विचारांचा सूर्योदय करायचा होता. माझ्या मनात निश्चलता, अढळता, जिद्द, चिकाटी, विश्वास निर्माण करायचा होता. आज पुन्हा नवीन वर्ष येतंय माझं नव्यानं स्वागत करायला . मलाही त्याला सामोरे जायला हवं. पण रडतखडत नाही, हसतमुखानं , नव्या उत्साहानं.
लहान तान्ह्या बाळाला कुशीत घ्यायला आई जितकी आतुर असते, तेवढेच आतुर होऊन या नव्या वर्षाचे स्वागत करा.
नवीन वर्षात परमेश्वराला काही मागूच नका. आणि मागायचं असेल तर इतकच मागा की तू जे देशील ते आनंदाने स्वीकारण्याचा सामर्थ्य दे. ईश्वराच्या देण्यावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला जे देईल त्याचा आनंदाने स्वीकार करा. येणारा प्रत्येक अनुभव सकारात्मक दृष्टीने पहा. लहान बाळ रडलं तर आपण रडतो का ? नाही ना ? उलट अजून ते लहान आहे असं समजून त्याला हसवण्याचा प्रयत्न करतो.
अगदी तसंच येणाऱ्या वर्षातील प्रत्येक अनुभव मग तो चांगला असो वा वाईट असो तो आनंदाने फुलवण्याचा प्रयत्न करा.
नवीन वर्षात स्वतः नाराज, निराश होण्यापेक्षा नवीन वर्षालाच नाराज करू नका .
नवीन वर्षातील प्रत्येक दिवसाला प्रत्येक क्षणाला विश्वास द्या . कितीही आणि काही झालं तरी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मी ढळू देणार नाही .
मग बघा नवीन वर्षातील येणारा क्षण कसा फुलतो ते. रोज नव्याने उगवणाऱ्या फुलासारखा .
*सूर्याला नव्याने उगवू द्या*
*फुलाला नव्याने फुलू द्या* . त्याच्याबरोबर तुम्हीही फुला. आनंदाच्या आकाशात स्वछंदपणे भरारी मारा. क्षितिजाच्या पलीकडे जाऊन पोहोचा. जिथे कोणीतरी तुमची वाट पाहत असेल. कोण असेल ते माहितेय ? नवा सूर्योदय, सुख, आनंद ओंजळीत घेऊन थांबलेला. तुमच्यावर आनंदाच्या किरणांची बरसात करण्यासाठी. त्या सोनेरी किरणांच्या प्रकाशात न्हाऊन निघा आणि वाट पहा असा सूर्योदय पुन्हा होण्याची.
*
*सौ. आराधना गुरव*
9075829534
*मु. पो. वडूज ता. खटाव जि. सातारा*

No comments:
Post a Comment